मोक्ष : टाईट इफेक्ट

 जनरेशन z साठी श्रीधर तिळवे नाईक 

तुम्ही येण्यापूर्वी बरच काही घडलं होतं 

महत्त्वकांक्षेला गरुड फुटण्याऐवजी मर्डर फुटला होता 


सत्तेवर शिवाजी महाराजांनी येण्याएवजी 

केवळ गणपतीला केला जाणारा देखावा आला होता 

आणि तो दरवर्षी बदलत होता 


एक उद्दामपणा 

उड्डाणपणा म्हणून सेटल झाला होता 


एक खोटा गर्व 

वर्णाच्या अहंकारात लोळत होता 


राजकीय अचूक राहण्याची माझी क्षमता 

संपत चालली होती 


मी एक्झॉस्ट होणार होतो 

आणि मला तडाखा मारला जात होता 


तुम्ही येण्यापूर्वी बरंच काही घडत होतं 




मी तंत्र शिकवत होतो

आणि तिकडे अशोक वृक्षाखाली 

एक निवडुंग उगवत होता 


एक दैदीप्यमान मोक्षता आणि दुसरीकडे भोंगळ वक्षता 


दक्षतांचा सारा खटाटोप फक्त टोप्या घालणारा 


लेडीज सूर्योदय 

हिडीस सूर्यास्त बनत चाललेला 


ज्याला त्वचाही कळत नव्हती 

तो आत्म्यावर आरुढ 


प्राण जाण्याची वेळ 

आणि घड्याळे तुटत चाललेली 


ब्लॅकमेल म्हणून केले गेलेले व्हिडिओ 

व्हाईट कॉल म्हणून परतलेले 


आता या व्हाईट कॉलर लोकांचे करायचे काय 

ज्यांना महत्त्वाची वाटते माणसापेक्षा गाय 

मोक्षापेक्षा सेक्सचा अधिकृत टाय 


ज्यांच्या पोटात कासवाचे पाय 

आणि जे शोधतात डुकरामध्ये 

अवतार 


मी प्राण्यांचा द्वेष करत नाही 

पण ज्यांच्यामुळे माणसाचा प्राण जातो 

अशा लोकांना 

त्राण देत नाही 


तंत्र कोणी बिघडवले 

आणि मंत्र कोणी बडवले ?


चौकशी कमिशन मध्ये फक्त चौकशी 

आणि दिशा दाखवणारे चौक 

बिंदू रुपात सुद्धा शिल्लक नाहीत 


तुम्ही येण्यापूर्वी बरंच काही घडत होतं 



ज्याला लहान मुलगी स्वतःची मुलगी म्हणून दिसत नाही 

त्याला मी माझ्या दारात उभा करत नाही 


बळाला आकार समजणारे लोक बळीचे वंशज नसतात 

बळी मागणारे 

बळीचे वंशज नसतात 


कितीही अहिंसा अंगात बाणवली 

तरी बलात्काराला कशी क्षमा द्यावी ?


मी बुद्धाकडून शिवाकडे गेलो 

कारण मी खूप बलात्कार पाहिले 


काही लोकांना कमळ कळत नाही 

ते चिखल करतात 

आणि त्यांच्यासाठी त्रिशूल काढावा लागतो 



गड छत्रपती नसतात 

गड ढकलण्यासाठी सुद्धा असतात 


नवीन पिढीला सोवळी समजणारे लोक 

तिला ओवरएस्टिमेट करत असतात  


प्रत्येक पिढीचे स्वतःचे खूनी असतात 

आणि तारणकर्तेही 


तुम्ही येण्यापूर्वीच 

तुमची चाहूल लागली होती 


तुम्ही हूल देऊ शकता आणि भूलही 


तुम्ही घोडा लावू शकता आणि गाढव ही 


तुम्ही दळण दळू शकता आणि वादळही 


तुम्हीही पॅकेज डील आहात 

आणि तुम्हालाही 

संपूर्ण स्वीकारण्याखेरीज माझ्यापुढे पर्याय नाही 




मी माझ्या प्रेयसीला दुसऱ्याबरोबर जाताना पाहिलेले आहे 


एकदा तरुण

एकदा म्हातारा 

आणि सुरुवातीला मध्यमवयीन 


आता ही गोष्ट मला तुमच्या पिढीचे बनवते का ?


मी केवळ लिविंग रिलेशनशिप मध्ये राहिलो म्हणून 

तुमच्या पिढीचा होतो का 


पिढी म्हणजे काय 


समान विचार करणारे समांतर लोक 


मी तुमच्या जन्माआधीच तुम्हाला समांतर होतो का ?



माझी मानखंडना कोणीच करू शकत नाही

कारण माझ्यात मान नाही 


माझी कोणी अवहेलनाही करू शकत नाही 

कारण माझ्यात मीच नाही 


जे आजचे प्रसन्न आहे 

ते उद्याचे प्रच्छन्न असू शकते


छिन्न विच्छिन्न व्हायला मुळात तुम्ही चिन्ह विचिन्ह असायला लागता 


मी सर्वच भाषांच्या आणि चिन्हकीच्या पलीकडे गेलोय 


मी तुम्हाला फक्त पहात नाही 

माझा अवयव असल्याचा 

साक्षात्कार घेत राहतो 


मोक्षाचे वैशिष्ट्य हेच 

त्याला तरुण अवयव फुटत असतात 



विटंबना कोण कोणाची करतोय विश्वासघात कोण कोणाचा करतोय 

पाठीत सुरा कोण कोणाच्या खूपसतोय 


खूप झालेल्या लोकांना सुद्धा आता तूप पटत नाही रोज खाणे 

त्यांना अधून मधून पिझ्झा लागतो किंवा बर्गर 


नुसत्या पाण्यावर ते तरंगत नाहीत

त्यांना कुल शील करायला कुल चिल्ड कोल्ड्रिंक लागते 


तुमच्या खाण्याच्या सवयी शरीराच्या दृष्टीने किती हेल्दी 

असा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो 


एक वय असते सर्व काही पचायचे 

म्हणून मी तुम्हाला अडवत नाही 


मात्र तुम्ही म्हातारपणातल्या शरीरासाठी काय करत आहात 


तुम्ही म्हणाल 

जे म्हातारपणाचा विचार करते ते तारुण्य कसले 


गोष्टी दोन्ही बाजूंनी पटवता येतात 


मी सर्व बाजूंनी सर्वांच्यावर चालून जातो 

कारण मला केंद्र नाही 



तुम्ही मला गुरुपौर्णिमेचे मेसेज पाठवले 

आणि मी तुम्हाला शिष्यपौर्णिमेचे 


एका आंदोलनामुळे हा फरक पडला का ?



माणसे वास्तवात सुद्धा स्वतःची वास्तू बांधतात 


शेवटी माणसे जगायला जन्माला येतात

जगायला बाहेर पडतात

जगायला आत येतात


आणि जगणे जगायला शक्य नाही असं वाटतं तेव्हा आत्महत्या ही करतात 


तुम्ही हे सर्व नेमक्या कशा प्रकारच्या जगण्यासाठी करत आहात ?


ज्या वयात तुम्ही आहात 

त्यात थ्रिल आवडते 


चिल करून किल करायला आवडते 


पण हे सर्व कशासाठी 


स्वतःमध्ये वाकून पाहणे 

म्हणजे स्वतःचाच पाठीचा कणा तंदुरुस्त ठेवणे असते 


तेव्हा वाका स्वतः त


१०


हृदयातला अगडबंब आगडोंग 

रक्तात काहीच नीट न झाल्याने पिसाळलेली बोंब 


तुम्हाला कितीही जहाजे बनवता येवोत

कोणीतरी स्वतःच्या खाडीत तुम्हाला गाठू शकतो 


परीक्षाच नीट होणार नसतील 

तर मूल्यमापन नीट होईल याची काय गॅरंटी 


स्वतःला स्वस्तात विकणारे शिक्षक 

विद्येच्या माहेराला श्रद्धांजली अर्पण करून 

स्वतःला तिलांजली देणारे शिक्षक 


ते कोण भिकारशोट आहेत 

जे पेपर फोडतात 

ते कोण हलकटमोठ आहेत 

जे पेपर विकत घेतात 


शिक्षणासकट सर्व सिस्टीम विकत घेण्याची घाई 

नेमकी कोणाला लागलेली आहे ?


पैसे फेकून सरस्वतीला डिस्को करायला लावू असे कोणाकोणाला वाटते आहे ?


प्रश्न फक्त पेपर फुटीचा नसतो 

प्रश्न संपूर्ण पाणी 

पिण्यायोग्य राहिले आहे की नाही हे तपासण्याचा असतो 


११


काहीच न करणे 

काहीतरी करत असल्याचा आव आणणे 

आणि त्याविरुद्ध कोणी भडकले 

की त्याच्यावर ताव काढणे 


राजकारणी लोकांनी या देशात याशिवाय काय केले आहे ?


दाखवण्यापुरती योजना 

२० टक्के उदाहरण 

आणि ८०% स्वतःचे उदरभरण 


राजकीय फक्त आर्थिक बनले 

आणि तिथेच सर्व राजकारण गंडले 


धर्म फक्त अर्थाला टेकू द्यायला जन्माला आला आहे काय ?


आपण विवेकाचे नागरिक आहोत 

हे तुम्हाला खरोखर कळले आहे 

की पोटाला चिमटा पडल्याने 

हे विवेकासारखे काही तात्कालीक उसळले आहे ?


आत्मपरीक्षणाला नकार देण्याची सोय या व्यवस्थेत आहे 


तुम्ही ती वापरू शकता 

पण स्वतःला फसवायला जाल 

तर आयुष्यभर स्वतःमध्ये बसून राहाल 


या देशात आत्मवंचना लहानपणापासून शिकवली जाते 


१२


तुमच्या आत्महत्या मला किती दुखावून गेल्या हे कवितेत सांगणे सुद्धा अशक्य 


केवळ लोंबकळणारे त्रिशंकू जन्माला घालायला आम्ही ही व्यवस्था जन्माला घातली आहे का? 


लोक आयुष्याची वर्षे घासतात आणि नालायक लोकांच्या मुळे झाडे नासतात 


केवळ नासाचे नाव घेऊन 

तुमचे नासवणे अधिकृत बनते काय?


निषेधामधली हवा काढून घेतली गेली 

आणि तुम्ही अनावर झाला 


आता आरोप तुम्ही जनावर झाल्याचा 


आता मीही टिळकांच्या प्रमाणे विचारावे का 

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?


१३


तुम्ही फक्त अवसान आणले नाही 

तुम्ही थेट आंदोलन घेऊन आलात 


सिस्टीम रणगाड्या प्रमाणे चालून येवो 

किंवा महापुराप्रमाणे 

लढणारे झुरळांच्या सारखे शेवटपर्यंत लढत राहतात 


शेवटी टिकण्याच्या लढाईत झुरळे पराभूत होत नाहीत 

हे वैज्ञानिक सत्य 

सायन्सला सिल्याबस मधून काढू इच्छिणाऱ्यांना कसे कळणार ?


तुमच्या किचन फाइट्स शेवटी ग्लोबल झाल्या 


याला मी आता नवा झुरळावतार म्हणावे का ?


१४


जग बदलत असते म्हणून टिकते 

जे जग बदलत नाही ते नाहीसे होते 


विवेक नसलेले धाडस 

शेवटी कोणाच्यातरी हाताखालचे पाडस बनते 


तेव्हा बेमुर्वतपणा बेशहाणपणा होऊ देऊ नका 


आंदोलनात कधीकधी बे दुने एक आणि बे दुणे पाच असेही होऊ शकते 


मी तुमचे फोटो काढले नाहीत किंवा व्हिडिओही टाकले नाहीत 


व्हायलेंट आदेशांना अधिकृत कुणी केले 

हे कुठल्या फोटोत येणार आहे ? 


राजकारण अलीकडे फोटोजनिक आणि व्हिडिओ जनिक झालेले आहे 


पण त्यातला वायलन्स ?


पिंड्रोप व्हायलन्स?


कुठलीच तरुण पिढी 

स्टेपल मारून ठेवावी इतकी सेटल नसते 


तिचा चंचलपणा 

तिचा अवखळपणा 

तिला अनअप्रोचेबल बनवतो 


पेपर खरेदी करणारे लोक सुद्धा तुमच्यातही होते 


आणि आता त्या विरोधात आंदोलन करणारे ही तुमच्यातच आहेत 


लोक माती खातात 

आणि माती पिकवतात 


मी विस्मय चकित नाही 

माती इतकाच तटस्थ आहे 


या देशातील लोक 

अत्याचार झाल्यानंतरही स्वतःची सभ्यता टिकवतात 

आणि हेच ह्या देशातील लोकांचे शहाणपण आहे 


पण त्याचा पॉलिटिकल फायदा किती घ्यायचा 

याचा राजकारणी लोकांना पोच राहिलेला नाही 


तुमचे पिसाळणे 

प्रथम कुत्र्यासारखे समजणे 

हे त्याचेच लक्षण 


हातात लाठ्या देणे 

आणि पाणी मार देणे 

हे हात दाखवून अवलक्षण 


जबाबदारी पार पाडायची नाही 

आणि कोणी अंगावर आले 

की जबाबदारी घ्यायची नाही 

फक्त जबाबदारी फेटाळत राहायची 


आता याला मी भारतीय राजकारणी लोकांची जीवनशैली म्हणावे काय ?


कुरुक्षेत्रावर सर्व क्षत्रिय मारून टाकावे 

मग स्वतःच्याच कुळाला सत्यानाश करत 

नाहीसे होताना पहावे 

आणि शेवटी 

स्वतःच्या अंगठ्यात घुसलेला बाण तटस्थपणे पहात 

मरून जावे 


या दरम्यान किती हिंसा आहे 

किती जण मेले आहेत 

यांचा हिशेब न ठेवणारा हा 

राजकारणी थाट आहे 


यासाठी विलक्षण क्रौर्य लागते 

आणि ते इथे मुबलक आहे 


तेव्हा लढाई कुणाशी आहे 

ते शाई वाळायच्या आत समजून घ्या 


तुम्ही म्हणताय 

सर आम्हाला आशीर्वाद द्या 


मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत नाही 

फक्त शिष्यपौर्णिमा तुमच्यात उदयाला येवो 

एवढीच अपेक्षा करतोय 


बाकी अंगठावर करणारे तुमचे अंगठे तुमच्याजवळ आहेतच 

त्यांना इंटर कनेक्टेड ठेवा म्हणजे झाले 


अलीकडे द्रोणाचार्य अंगठे मागत नाहीत 

विकत घेतात 

तेव्हा सावध 


Best wishes from bottom of the प्राण,heart and head.


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष सिरीज मधील मोक्ष टाईट इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog